*चुकीला माफी आहे*
 
होय , बरोबरच वाचलं आपण ! *चुकीला माफी आहे!*  आणि नेमका हाच महत्वाचा  संस्कार आपल्याला आपल्या मुलांवर करायचा आहे . 
निसर्गाने प्रत्येक गोष्ट अगदी वेगळी बनवली आहे . एका झाडाला हजारो पानं असतात पण जर का प्रत्येक पानाचा शास्त्रिय रित्या अभ्यास केला तर हे लक्षात येतं की एकाच झाडाची पानं असूनही ती निराळी असतात . निसर्गात जर इतकी विविधता आहे तर मग आपणही अशी माणसामाणसात असलेली विविधता स्वीकारायला हवी. प्रत्येकाचं आपलं एक स्थान असतं , वेगळेपण असतं , वैशिष्ठ्य असतं तेही स्वीकारायला हवं. प्रत्येकाने आपल्याच साच्यात बसावं हा अट्टहास सोडायला हवा . पालकत्वाच्या द्रुष्टीने तर असा स्वीकार भाव अतिशय आवश्यक आहे . मोगऱ्याचा वास घेताना कधी असं मनात येतं का की याचा रंग लाल असता तर बरं झालं असतं . पण मुलांना मात्र आपण जे ते नाही आहेत ते बनवण्याचा प्रयत्न करत रहातो. असं करण्यापेक्षा ते काय आहेत याचा शोध घेवून त्यांच्यामधील चांगल्या गुणांची त्यांना ओळख करुन द्यायला हवी. जे नाही आहे त्यावर लक्ष केंद्रित करुन तणाव निर्माण करण्यापेक्षा जे ते आहेत त्याचा पूर्ण आनंद घ्यायला हवा व त्यांनाही तसंच शिकवायला हवं . शेवटी मुलं आपलंच अनुकरण करणार , आपणच जर सतत चुका काढत असू तर मुलंही फक्त स्वतःच्या चुका शोधत राहणार आणि स्वतःला टॉर्चर करत राहणार. अशा पद्धतीने वाढलेली मुले मोठेपणी ऑफीस मधे सहकाऱ्यांच्या चुका शोधत राहतात , घरामध्ये पार्टनर च्या, अगदी आई वडिलांच्या (म्हणजे आपल्या ) चुका शोधत राहतात आणि पालक झाल्यावर मुलांच्या सुद्धा सतत चुका शोधुन त्यांना त्रास देत राहतात . अशा लोकांच्या सहवासात कोणीच आनंदी  राहू शकत नाही , मोकळेपणाने वागू शकत नाही. कारण अशा लोकांवर  संस्कारच चुका शोधण्याचा झालेला असतो आणि कळत नकळत हा संस्कार त्यांच्या प्रिय पालकांकडूनच झालेला असतो . त्यामुळे आपल्यापासूनच हा चुकीचा संस्कार आपण मोडीत काढूया .  यासाठी  खालील गोष्टी कराव्या -
 
1. मुलांच्या छोट्या छोट्या अचिव्हमेंट मधे सुद्धा त्यांचे कौतुक करावे , त्यांना प्रेम द्यावे .
 
2. चुक होणं नॉर्मल आहे,  चुकांतून आपण शिकत असतो , विकासाचा पुढचा टप्पा गाठत असतो हे मुलांना समजेल अशीच आपली क्रुती असावी .
 
3. किती मार्क्स कमी मिळाले हे मुलांच्या मनावर बिंबवण्यापेक्षा , 2 मार्क कुठे गेले असं विचारण्यापेक्षा जे  मिळालं आहे त्याचा स्वीकार करुन त्याचा आनंद साजरा करायला त्यांना शिकवलं पाहिजे .
 
4. अवाजवी अपेक्षा ठेवल्यामुळे मुले जिंकण्याचा आनंद साजरा करू शकत नाहीत. आणि जगणं विसरून जातात हे पालकांनी लक्षात असू द्यावं.
 
5.इतरांना सतत चुकीचं ठरवलं की आपण बरोबर ठरतो असं नसतं . त्यामुळे ' बघ , सांगितलं होत आधीच , केलीसच ना चुक? '  किंवा ' तूला काय कळतं त्यातलं'  किंवा ' मी तुझ्या येवढी असताना किती हुशार होते’ किंवा ' त्यात काय येवढं हे कोणीही करू शकत , मी अजून छान केलं असतं'  असे शब्दप्रयोग करुन मुलांचे व इतर कोणाचेही मानसिक खच्चीकरण करने टाळावे . कारण सतत असे वागून तो आपल्या सवयीचा भाग बनतो आणि मग चांगलं काही दिसतच नाही . आणि अर्थातच आपली ही सवय नकळत मुले सुद्धा शोषून घेतात.
 
6. सतत चुका काढणाच्या सवयीमुळे मुलांना इतर सर्वच जण तुच्छ वाटू लागतात , त्याच्यामधे अहंकाराची भावना तयार होते(कारण मुलं  सुद्धा इतरांना त्याच तराजूने तोलू लागतात ज्या तराजूतून त्यांना तोललं जातं ) किंवा मग ते स्वतःला कमी लेखतात त्यामुळे त्यांच्यामधे न्यूनगंड निर्माण होतो याचे भान असू द्यावे .
 
7. “एडिसन ला विजेचा बल्ब बनवण्यामधे  999 वेळा अपयश आले मग  त्यावर तो असं म्हणाला की मला 999 फॉर्मुले माहित आहेत ज्यामुळे बल्ब बनवला जावु शकत नाही व एक फॉर्मुला माहित आहे ज्याने बल्ब बनतो.”   ही मोटिव्हेशनल स्टोरी फक्त सांगण्यासाठी नसून आपल्याही आचरणात आणण्यासाठी आहे याची पालकांनी जाणीव ठेवावी. 
 
8. जे पालक सहजतेने स्वतःला माफ करू शकतात , स्वतःला चुकण्याची परवानगी देतात तेच मुलांचाही स्वीकार करू शकतात म्हणून सर्वात आधी स्वतःला माफ करूया , स्वतःमधे लवचिकता आणूया आणि निसर्गाने भेट केलेल्या विविधतेचा आदर करूया .
 
9. तू चुकलास तरी मी आहे सावरायला ...तू पडलास तरी मी आहे हात द्यायला ...तू अपयशी झालास तरीही मी आहे आधार द्यायला आणि पुन्हा नवीन जोमानं काम करण्यासाठी प्रेरणा द्यायला... असा विश्वास मुलांना वाटेल अशीच आपली क्रुती हवी .
 
10. एकूणच मुलांमध्ये सम भावनेची निर्मिती करण्याची गरज आहे. कोणी बरोबर-चूक नाही , कमी -अधिक नाही . सर्वच जणांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने , वैशिश्ठ्या नुसार जगण्याचा अधिकार आहे. कारण ते वेगळेपण निसर्गानेच बहाल केलेलं आहे हे मुलांना आपल्या क्रुतीतुन दाखवून द्यावं लागेल.
 
*काय मग चुकीला माफी आहे ना ? ?*
 
    
*_वाचाल तर वाचाल_*
📚📖📚📖📚📖📚
 
 
 
 
 
 
 
 
 
 
Shito Ryu Sports Karate & Kickboxing Asso.(Regd.) 0